राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली असून, ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशीच काही जण पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटप करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान संशयितांकडून प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेची माहिती तातडीने शिक्षण विभागाला देण्यात आली. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि परीक्षेची पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येणार आल्याचे सांगितले जात आहे. नवीन परीक्षा कधी घेण्यात येणार, याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर आली आणि त्यासाठी आर्थिक व्यवहार झाला का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परीक्षा स्थगित झाल्यास राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा होणार असून, अनेक महिन्यांच्या तयारीनंतर ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विविध स्पर्धा व भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,186 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क