छत्रपती संभाजीनगर : “तुमचे बँकेचे पैसे माझ्याकडे आले आहेत. ते देण्यासाठी आलो असून, त्यासाठी तुमच्या सोन्याचे वजन करावे लागेल,” अशी थाप मारत एका भामट्याने ७० वर्षीय वृद्धेला भरदिवसा गंडा घालत त्यांच्या हातातील सुमारे सात तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या लंपास केल्याची घटना मुकुंदवाडी परिसरात घडली. हा प्रकार २५ जून रोजी सकाळी ७.४५ ते ८ वाजण्याच्या सुमारास घडला असून, संबंधित भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी कांताबाई बाळाजी सुपेकर (वय ७०, रा. रामनगर, मुकुंदवाडी) यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांताबाई या २५ जून रोजी सकाळी ओमशांती केंद्रातून योगाभ्यास करून घरी परतत होत्या. रामनगर रोडवर रामलता दवाखान्याजवळ एक अनोळखी व्यक्ती दुचाकीसह उभी होती. त्याने कांताबाई यांना अडवत, “तुमचे बँकेचे पैसे माझ्याकडे आले आहेत. ते घेण्यासाठी तुमच्या सोन्याचे वजन करणे आवश्यक आहे. माझे वडील साहेब असून ते लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये आहेत,” अशी बतावणी केली.

भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांताबाई यांनी हातातील सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या. त्यानंतर आरोपी त्यांना दुचाकीवरून लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तेथे पाटल्या स्वतःकडे ठेवत त्याने कांताबाईंना बाहेर थांबण्यास सांगितले. मात्र, काही वेळातच तो तेथून पसार झाला.

संशय आल्याने कांताबाईंनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता संबंधित व्यक्तीबाबत कोणालाही माहिती नसल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नातेवाईकांना माहिती देत पोलिसांत धाव घेतली.

आरोपीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून, त्याने निळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट परिधान केला होता. तो शुद्ध मराठीत बोलत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी घोरपडे करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

541 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क