छत्रपती संभाजीनगर : राज्यातील एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले असून, १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. या वाहनधारकांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असून, संबंधित वाहनांची आरटीओ कार्यालयातील अनेक कामेही केली जाणार नसल्याचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले आहेत.

परिवहन विभागाने यापूर्वी वाहनधारकांना एचएसआरपी बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. मात्र, ३० जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन अधिनियम १९८९ मधील नियम ५० तसेच कलम १७७ अन्वये कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडूनही कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचना परिवहन आयुक्तालयाने दिल्या आहेत.

एचएसआरपी नसलेल्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनामध्ये बदल करणे, परवान्याचे नूतनीकरण आदी आरटीओमधील कामे करता येणार नाहीत. मात्र, वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एप्रिल २०१९ पूर्वीच्या ४ लाख ८ हजार ८६१ वाहनांना आतापर्यंत एचएसआरपी बसविण्यात आली आहे. तर ३ लाख ७५ हजार ५१७ वाहनधारकांनी नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. मात्र, अजूनही सुमारे १ लाख ६९ हजार ६२२ वाहनधारकांनी एचएसआरपीसाठी नोंदणी केलेली नाही.

“३० जूनपूर्वी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून नियमानुसार कारवाई केली जाईल,” असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,068 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क