छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बार, पब, परमिट रूम, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन, मोकळी मैदाने तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित कार्यक्रमांसाठी कडक नियमावली लागू केली आहे. हे आदेश पुढील ६० दिवसांसाठी लागू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उत्पादन शुल्क विभागाने बार व परमिट रूमला रात्री १.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली, तरी त्यानंतर आस्थापने सुरू ठेवणे बेकायदेशीर ठरणार आहे. तसेच रात्री १ वाजेनंतर कोणत्याही ग्राहकाची नवीन अन्न किंवा मद्याची ऑर्डर स्वीकारता येणार नाही. ग्राहकांना परिसर रिकामा करण्यासाठी केवळ ३० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.
लॉन, मोकळी मैदाने तसेच इतर ठिकाणी आयोजित डीजे आणि संगीताचे कार्यक्रम रात्री १० वाजताच बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परमिट रूममध्ये १८ वर्षांखालील मुलांना प्रवेश देण्यास मनाई असून २५ वर्षांखालील व्यक्तींना मद्य देऊ नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रवेशावेळी शासकीय ओळखपत्र तपासणे अनिवार्य राहणार आहे.
याशिवाय पब व बारमध्ये ग्राहकांना सामूहिकपणे नृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षारक्षक आणि बाउन्सर यांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक असून मागील १० वर्षांत गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना पोलिस उपायुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय कामावर ठेवता येणार नाही. ग्राहकांचा वावर असलेल्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही आणि दोन डीव्हीआर संच बसवून किमान १५ दिवसांचे रेकॉर्डिंग जतन करणे आवश्यक राहील. तसेच मद्यधुंद ग्राहक स्वतः वाहन चालवत नाहीत याची खात्री करण्यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि बार परिसरात मादक पदार्थ तसेच ई-सिगारेटच्या वापर व विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*