छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) व्यापक नियोजन केले असून, मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १,२६० जादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जळगाव विभागाकडून चालक-वाहकांसह उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ५० बसचाही समावेश आहे. आषाढी यात्रेचा मुख्य कालावधी २० ते ३० जुलैदरम्यान राहणार असून, २५ जुलै रोजी आषाढी एकादशी तर २३ जुलै रोजी वाखरी येथे होणाऱ्या प्रसिद्ध रिंगण सोहळ्यासाठीही विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दशमी, एकादशी आणि द्वादशी या प्रमुख दिवशी कमी प्रवासी भार असलेल्या नियमित फेऱ्या तात्पुरत्या स्थगित करून त्या बस पंढरपूर मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी मंदिर, मठ आणि दिंड्यांमध्ये जाऊन आगाऊ संगणकीय आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विभागनिहाय नियोजनानुसार परभणी विभागातून २५०, नांदेड २००, धाराशिव १७०, छत्रपती संभाजीनगर १६५, बीड १५५, लातूर १४०, जालना १३० आणि जळगाव विभागातून ५० अशा एकूण १,२६० जादा बस यात्रेसाठी धावणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागाच्या बससाठी पंढरपूर येथील देगाव भीमा बसस्थानक निश्चित करण्यात आले असून, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे यांची यात्रेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी ८४ वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहेत. याशिवाय बसमध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्ती करण्यासाठी ३८ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तसेच धाराशिव विभागाच्या दोन ब्रेकडाऊन व्हॅनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गळती असलेल्या किंवा तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण बस यात्रेसाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. खिडक्यांच्या काचा, वायपर्स, ब्रेक, लाइट यांची काटेकोर तपासणी करूनच बस मार्गावर सोडण्यात येणार असून, अनुभवी चालकांचीच नियुक्ती केली जाणार आहे. तसेच प्रत्येक बसवर चालक व वाहकाचे नाव आणि त्यांचा मोबाईल क्रमांक ठळकपणे दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

393 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क