छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसीच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील विद्यार्थ्यांनी कौशल्य, कल्पकता आणि नवोन्मेष यांचा उत्कृष्ट संगम घडवत भंगार साहित्यापासून दोन इलेक्ट्रिक रेसिंग कार तयार करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, केवळ पाच दिवसांत ६० विद्यार्थ्यांनी स्वतः पार्ट-टू-पार्ट असेंबलिंग करत या कारची निर्मिती केली.
ईव्हीएमटी, ईव्हीपीडी, इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियन आणि वेल्डिंग या विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा प्रकल्प पूर्ण केला. जुन्या टायर्स, खराब वाहनांमधील नट-बोल्ट, स्टिअरिंग, रॉड्स, शॉक अॅब्झॉर्बर, ब्रेक्स, मोटर, ईव्ही कंट्रोलर आणि वायरिंगसारख्या भंगार साहित्याचा वापर करून या रेसिंग कार साकारण्यात आल्या.
शनिवारी केंद्राचे संचालक डॉ. गिरधारी वाघमारे आणि केंद्रप्रमुख कमलेश नुथी यांच्या उपस्थितीत या कारचे अनावरण करण्यात आले. यावेळी डॉ. वाघमारे यांनी सांगितले की, शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये फूड प्रोसेसिंग, ऑटोमोटिव्ह, कॅपिटल गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनसह ११ विविध अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करणे हेच केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
या केंद्रातून आतापर्यंत २१ बॅचमधील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यापैकी ३०० जणांना विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. तर ५० विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तसेच दर शनिवारी केंद्रात रोजगार मेळाव्याचे आयोजनही केले जाते.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ईव्ही रेसिंग कारमध्ये पीएमएसएम मोटर आणि ४८ व्होल्ट क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. एका फुल चार्जमध्ये ही कार सुमारे १५ किलोमीटरपर्यंत धावू शकते, तर तिचा कमाल वेग ताशी ३० किलोमीटर इतका आहे. अनावरणावेळी या कारचे यशस्वी प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या अभिनव कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*