छत्रपती संभाजीनगर : वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, यंदाची वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून साजरी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. यात्रेदरम्यान भाविकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसूत्र सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, आरोग्य, परिवहन, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेदरम्यान भाविकांसाठी १३ ठिकाणी फराळ वाटप केंद्र उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवक, कचरा संकलनासाठी कचराकुंड्या आणि स्वच्छतेची व्यवस्था केली जाणार आहे. यात्रास्थळी निर्माण होणारा कचरा तातडीने उचलण्यासाठी सफाई कर्मचारी, घंटागाड्या आणि कचरा संकलन वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन चार पाळ्यांमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार असून, एकूण ३,४२० स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC) तसेच स्वयंसेवी संस्थांतील युवक-युवती आणि नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून पुढे यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने यात्रा परिसर आणि मंदिरात मिळून ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पोलीस यंत्रणा या कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने यात्रेकरूंची संख्याही मोजली जाणार आहे.

याशिवाय वाहतूक नियोजन, प्रकाश व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निशमन सेवा, आरोग्य पथके, अन्न नमुना तपासणी आणि आवश्यक पोलीस बंदोबस्त याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. भाविकांनी स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करावे आणि यंदाची आषाढी वारी ‘स्वच्छ वारी’ म्हणून यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

714 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क