छत्रपती संभाजीनगर : शाश्वत आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी (दि. ९) क्रांती चौकात उपोषण आंदोलन केल्यानंतर मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी विभागीय आयुक्तालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मंगळवारी (दि. ११) त्यांचे उपोषण सुरूच असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत दाते पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मराठा समाजाला कायदेशीर, घटनात्मक आणि न्यायालयीन कसोटीवर टिकणारे शाश्वत आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे दाते पाटील यांनी सांगितले.
हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे मराठा-कुणबी नोंद किंवा वंशावळ नसलेल्या मराठा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, शुल्क सवलत आणि शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणी आहे.
याशिवाय आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, सारथी संस्थेला पाच हजार कोटी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला दहा हजार कोटींचा निधी द्यावा, प्रलंबित उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात तसेच कायगाव येथे मराठा हुतात्मा स्मारक उभारावे, या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रा. माणिकराव शिंदे, डॉ. शिवानंद भानुसे, योगेश शेळके धामोरीकर, सुनील कोटकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण
सर्व मागण्या मान्य होईपर्यंत दाते पाटील उपोषण सोडणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. तसेच मनोज जरांगे यांना कोणताही विरोध नसून, हा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून शाश्वत मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*