छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या श्रावण महिन्यात धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मीळ योग जुळून आला आहे. १७ ऑगस्ट म्हणजेच सोमवार रोजी श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी साजरी होणार आहे. पंचांगानुसार तब्बल ३० वर्षांनंतर असा योग आला असून, त्यामुळे शिवभक्त आणि नागदेवतेची पूजा करणाऱ्या भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे.

यापूर्वी १९ ऑगस्ट १९९६ रोजी श्रावणाचा पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली होती. त्यानंतर आता १७ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा हा योग जुळून आला आहे. तीन वर्षांपूर्वी, २०२३ मध्येही श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आली होती; मात्र त्यावेळी २१ ऑगस्टचा सोमवार हा श्रावणातील तिसरा सोमवार होता.

सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असल्याने या दिवशी शिवलिंगाची पूजा, अभिषेक आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. त्याच दिवशी नागपंचमी असल्याने नागदेवतेची पूजा करण्याचीही संधी भाविकांना मिळणार आहे. यंदाच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि शिव योग देखील असल्याचे पंचांगात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आध्यात्मिक साधना, जप, ध्यान आणि पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जात आहे.

धार्मिक आख्यायिकेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी नागाने देव-असुरांना सहकार्य केले होते. समुद्रमंथनातून निघालेले विष भगवान शंकरांनी प्राशन केले. वासुकीची भक्ती आणि सेवा पाहून महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात धारण केले. त्यामुळे शिवलिंगासोबत नागदेवतेची पूजा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या दुर्मीळ योगामुळे १७ ऑगस्ट रोजी मंदिरांमध्ये विशेष पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी होण्याची शक्यता असून, भाविकांसाठी हा दिवस श्रद्धा आणि भक्तीचा विशेष पर्व ठरणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

649 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क