छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन होणे, संगणक बंद पडणे, स्क्रीन काम न करणे तसेच काही उमेदवारांचे खाते काही मिनिटांतच लॉगआऊट होणे, अशा समस्यांना परीक्षार्थींना सामोरे जावे लागल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर आंदोलन सुरू केले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीही आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. “मागण्या पूर्ण होईपर्यंत सेव्हन हिलचे सेंटरच आपले ‘जंतर-मंतर’,” अशी आक्रमक भूमिका घेत दीपके यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनस्थळावरून न हलण्याचा इशारा दिला.
दूरवरून परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांनी तांत्रिक अडचणींबाबत केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, योग्य सहकार्य मिळाले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही कर्मचाऱ्यांनी “परीक्षार्थींना परीक्षा कशी द्यायची तेच कळत नाही,” अशा स्वरूपाची उत्तरे दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या घटनेवरून दीपके यांनी परीक्षा यंत्रणा आणि प्रशासनावर तीव्र टीका केली. “विद्यार्थी नापास झाले नसून ही संपूर्ण यंत्रणा आणि सरकार अपयशी ठरले आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्याची क्षमता नसेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य का बरबाद करत आहात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांनी या केंद्रावरील परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची तसेच जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांबाबत लिखित आश्वासन देण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*