छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेतील तांत्रिक गोंधळाविरोधात संभाजीनगरात काल दिवसभर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले. मात्र, परीक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुराणानगर येथील बायटेझ टेक्नॉलॉजीज परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी दिवसभर आंदोलन केले. परीक्षेदरम्यान नादुरुस्त कीबोर्ड, माऊस काम न करणे, सर्व्हर डाऊन होणे, स्क्रीनवर तांत्रिक अडचणी येणे तसेच पेपर आपोआप सबमिट होण्याच्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांसोबत ठिय्या मांडला. रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. या कालावधीत परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

“विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना तांत्रिक कारणांमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. संपूर्ण परीक्षा व्यवस्था जबाबदार आहे. विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी,” अशी मागणी दिपके यांनी केली.

तसेच परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपके यांनी दिला.

दरम्यान, हायकोर्टाच्या रजिस्ट्रारनेही या प्रकाराची दखल घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत कळविले जाईल, अशी नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायालय आणि सरकार या प्रकरणी काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

रात्री आंदोलन थांबले असले तरी विद्यार्थ्यांचा संताप कायम असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

298 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क