छत्रपती संभाजीनगर : निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून, बनावट ओळखपत्रे, टॅब तसेच तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रे तयार करत तलाठी पदावर नियुक्तीचे आदेश देऊन दोघांकडून तब्बल ४१ लाख ५० हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २४ फेब्रुवारी ते १३ ऑगस्टदरम्यान तहसील कार्यालय परिसरात घडला. याप्रकरणी बाळासाहेब हरबक आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिनाथ ज्ञानेश्वर वरकड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नी अश्विनी तुपे (माहेरचे नाव) यांना तलाठी पदावर नियुक्त करण्यासाठी १३ लाख ५० हजार रुपये, तर अक्षय साईनाथ गायकवाड यांच्या भावाला, स्वप्निल गायकवाड याला नियुक्ती मिळवून देण्यासाठी २८ लाख रुपये घेण्यात आले. यातील काही रक्कम आरटीजीएस व यूपीआयद्वारे, तर उर्वरित रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली.

१० ऑगस्ट रोजी एका ई-मेल आयडीवरून नियुक्ती आदेश पाठविण्यात आले. मात्र, १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या पडताळणीत संपूर्ण प्रकार बनावट असल्याचे उघड झाले. नियुक्ती आदेशावरील जिल्हाधिकारी कार्यालयाचा शिक्का तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्या स्वाक्षऱ्याही बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

तीन दिवस प्रशिक्षणाचा बनाव

उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी आरोपींनी २४ फेब्रुवारीपासून सुभेदारी विश्रामगृह, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीत आठवड्यातून तीन दिवस प्रशिक्षण दिले. पुणे व कोल्हापूरहून प्रशिक्षक येत असल्याचे सांगण्यात आले. तलाठी पदाची बनावट ओळखपत्रे व टॅब देण्यात आले. महसूल विभागाच्या संगणकीय कामासाठी तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीची पत्रेही देण्यात आली.

या प्रकरणात आणखी काही जणांना अशाच प्रकारे बोगस नियुक्ती दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. सहायक महसूल अधिकारी अनिल भगत यांच्या तक्रारीवरून पोलिस तपास सुरू असून, सहायक निरीक्षक मनोज शिंदे पुढील तपास करीत आहेत. फसवणूक झालेल्या इतर व्यक्तींनीही पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

935 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क