छत्रपती संभाजीनगर : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा उच्छाद मांडला असून अवघ्या २४ तासांत लुटमारीच्या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पद्मपुरा परिसरात घरासमोर शतपावली करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली. तर दुसऱ्या घटनेत कोकणवाडी चौकात पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावताना सुमारे दीड तोळे दागिने चोरट्यांच्या हाती लागले.

पदमपूऱ्यातील सुयोग कॉलनीत सोमवारी रात्री सुमारे ९ वाजता ही पहिली घटना घडली. सेवानिवृत्त अरुणा रमेशराव घाटेशाही (वय ६५) या जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी उभ्या होत्या. त्याचवेळी २५ ते ३० वयोगटातील दोन तरुण दुचाकीवरून आले. मागे बसलेल्या चोरट्याने काही क्षणांतच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावली आणि दोघेही पसार झाले.

यानंतर मंगळवारी रात्री ९.२७ वाजता कोकणवाडी चौकातील गणपती मंदिरासमोर दुसरी घटना घडली. औरंगपुऱ्यातील शीतल विजय जैन (वय ५०) या पती विजय जैन यांच्यासोबत मोपेडवरून बन्सीलालनगरकडे जात होत्या. त्यांचा पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी शीतल यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांच्या मिनी गंठणाला झटका दिला. त्यांनी गंठण हाताने पकडल्याने सुमारे दीड तोळ्याचा भाग चोरट्यांच्या हाती लागला.

ओढाताणीमुळे जैन दाम्पत्याच्या मोपेडचा तोल गेला; मात्र त्यांनी दुचाकी सावरल्याने अपघात टळला. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांचे वय आणि पद्धत सारखीच असल्याने एकाच टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून उपनिरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

357 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क