छत्रपती संभाजीनगर : रात्रंदिवस अभ्यास करूनही पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार तसेच परीक्षा वारंवार रद्द होणे आणि पुढे ढकलल्या जाण्याच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्पर्धा परीक्षार्थींचा आक्रोश आज, ११ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात पाहायला मिळणार आहे. विविध मागण्यांसाठी ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.
हजारो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या नेतृत्वाखाली सकाळी ९.३० वाजता आमखास मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
एमपीएससी अध्यक्षांचा तत्काळ राजीनामा, संशयित आरोपींचे फॉरेन्सिक ऑडिट, पारदर्शक परीक्षा पद्धती लागू करणे, परीक्षांचे काम दिलेल्या संबंधित एजन्सींची चौकशी तसेच इतर परीक्षांच्या निकालांची स्वतंत्र चौकशी अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या आहेत.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी क्रांती चौकात सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत काही तासांतच हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला होता. आता त्याच असंतोषाचे व्यापक रूप आजच्या महामोर्चातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मोर्चामुळे वाहतुकीत बदल
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे सुधारित आदेश जारी केले आहेत. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मोर्चा संपेपर्यंत आण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि उद्धवराव पाटील चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सुशील बोर्डे, डॉ. प्रकाश इंगळे, डॉ. कुणाल खरात, हनुमान शिंदे, डॉ. निलेश आंबेडकर आणि अभय टाकसाळ यांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*