छत्रपती संभाजीनगर : विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आता विमान तिकीट आणखी महाग होणार आहे. विमान इंधनाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून इंडिगोने देशांतर्गत विमानसेवेसाठी तिकिटांच्या किमतीवर अतिरिक्त इंधन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ७ ऑक्टोबरपासून नव्याने बुक करण्यात येणाऱ्या तिकिटांवर हे शुल्क लागू झाले आहे.
विमान कंपन्यांच्या खर्चामध्ये एटीएफ म्हणजेच विमान इंधनाचा मोठा वाटा असतो. गेल्या काही काळात इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चावर परिणाम झाला आहे. हा वाढीव खर्च काही प्रमाणात भरून काढण्यासाठी इंडिगोकडून प्रवाशांकडून अंतरानुसार अतिरिक्त रक्कम घेतली जाणार आहे.
देशांतर्गत प्रवासासाठी शुल्काची रक्कम प्रवासाच्या अंतरावर निश्चित करण्यात आली आहे. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ३७५ रुपये, ५०१ ते १००० किलोमीटरसाठी ६०० रुपये, १००१ ते १५०० किलोमीटरसाठी ९०० रुपये, तर १५०१ ते २००० किलोमीटरच्या प्रवासासाठी ११५० रुपये आकारले जाणार आहेत. २००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी प्रवाशांना १३०० रुपयांचा अतिरिक्त इंधन चार्ज द्यावा लागेल.
छत्रपती संभाजीनगरहून विविध शहरांना जाणाऱ्या प्रवाशांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. छत्रपती संभाजीनगर-मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर-हैदराबाद या मार्गांसाठी ३७५ रुपये, तर बंगळुरू आणि दिल्लीसारख्या तुलनेने लांब मार्गांसाठी ६०० रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
दरम्यान, हे शुल्क विमान तिकिटाच्या मूळ भाड्यापासून वेगळे असून तिकिटामध्ये फ्युएल चार्ज म्हणून समाविष्ट केले जाणार आहे. त्यामुळे विमान प्रवासाचे एकूण तिकीट भाडे वाढणार असून, आधीच महागलेल्या हवाई प्रवासाच्या खर्चात आणखी भर पडणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*