छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर दुरुस्तीची विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून तब्बल २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत शटडाऊन राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.
शहराला नवीन आणि जुन्या पाणीपुरवठा योजनांमधून दररोज सुमारे २२० ते २३० एमएलडी पाणी मिळते. मात्र, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक अद्याप विस्कळीत आहे. काही वसाहतींमध्ये तब्बल ९ ते १३ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मरीमाता जलकुंभावर अवलंबून असलेल्या दोन लाखांहून अधिक नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. तसेच दिल्लीगेट जलकुंभावरील गणेश कॉलनी, रशीदपुरा आणि टाईम्स कॉलनी परिसरातही १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आशिष वाणी यांनी सांगितले की, जुन्या १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर अनेक ठिकाणी गळती होत आहे. या गळती बंद करण्यासह आवश्यक दुरुस्तीची कामे शटडाऊनदरम्यान करण्यात येणार आहेत. या बंदचा सिडको-हडको परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कामांचा समावेश : क्रांतीचौक येथे शहागंजकडे जाणाऱ्या जलवाहिनीवर ५०० मि.मी. व्यासाचे दोन कंट्रोल व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत. जालननगरातील कमकुवत झालेल्या जलवाहिनीचा तुकडा बदलून काँक्रीटीकरण केले जाणार आहे. रेल्वे स्टेशनसमोरील तीन दिवसांपासून सुरू असलेली गळती दुरुस्त केली जाणार असून, बनेवाडीतील जुना व्हॉल्व्हही बंद करण्यात येणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*