छत्रपती संभाजीनगर : शहराच्या औद्योगिक पट्ट्यात नव्या गुंतवणुकीचे वारे पुन्हा वेगाने वाहू लागले आहेत. शेंद्रा आणि बिडकीन परिसरात विविध उद्योगांकडून जमीन घेण्यास सुरुवात झाली असून, येत्या काळात तब्बल ११ नवीन कंपन्यांचे प्रकल्प उभे राहण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ५ हजार थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.

काही दिवसांपूर्वी ल्युब्रिझोल कंपनीने परत केलेल्या जागेचा एमआयडीसीकडून नव्याने वापर करण्यात आला आहे. या जागेवर पाच कंपन्यांना भूखंड देण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून सुमारे ३ हजार ७५४ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे आधीपासून विकसित असलेल्या औद्योगिक परिसरात नव्या उद्योगांची भर पडणार आहे.

धृत ट्रान्समिशन, गुरुसुवा मोटर्स, गोदावरी पॉवर अँड इस्पात, जेएसडब्ल्यू मोटर्स आणि सुप्रीम नॉनवोव्हन इंडस्ट्रीज या कंपन्यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय अन्य काही कंपन्यांनीही उद्योग उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. बिडकीन परिसरात ४३, तर शेंद्रा परिसरात १६ लघुउद्योगांनी जागा घेतल्याची माहिती आहे.

या नव्या गुंतवणुकीचा परिणाम केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नसून, स्थानिक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. वाहननिर्मिती, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाइल यांसह विविध क्षेत्रांतील उद्योग वाढल्यास त्यांना लागणाऱ्या सेवा आणि साहित्याचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक व्यवसायांनाही काम मिळणार आहे.

शहरातील औद्योगिक साखळी अधिक मजबूत होण्याबरोबरच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होणार आहेत. बिडकीन आणि शेंद्रा हे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत असताना या नव्या प्रकल्पांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या अर्थव्यवस्थेलाही आणखी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

318 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क