पैठण : वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतविचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पैठणमध्ये भव्य श्री एकनाथी भागवत मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे. संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांच्या जीवनकार्याशी अतूट नाते असलेल्या या नगरीत उभे राहणारे हे मंदिर धार्मिक श्रद्धेसोबतच ज्ञान, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्वपूर्ण केंद्र बनविण्याचा प्रयत्न आहे.

नाथवंशज योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली असून, शांतिब्रह्म स्पिरिच्यूअल फाउंडेशनच्या माध्यमातून ती प्रत्यक्षात आणण्याचे नियोजन आहे. संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज असलेल्या योगिराज महाराजांच्या या उपक्रमात भाविकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

सहा एकरांवर उभारण्याचे नियोजन

प्रस्तावित मंदिरासाठी किमान सहा एकर जागेवर विस्तृत संकुल उभारण्याची योजना आहे. पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्यशैलीचा आधार घेत मंदिराची रचना केली जाणार आहे. परिसरातील तटबंदी आणि विविध ठिकाणी संतविचार मांडणारी भित्तिशिल्पे उभारण्याची संकल्पना आहे. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना संत एकनाथ महाराजांचे कार्य, त्यांचे तत्त्वज्ञान आणि समाजाला दिलेली शिकवण जाणून घेता येईल.

धर्मासोबत ज्ञान आणि संस्कारांवर भर

श्री एकनाथी भागवत मंदिराकडे केवळ दर्शनस्थळ म्हणून न पाहता संतसाहित्याच्या अभ्यासासाठी आणि वारकरी संस्कृतीच्या संवर्धनासाठी एक व्यासपीठ म्हणून पाहिले जात आहे. गोसेवा, आध्यात्मिक उपक्रम आणि नव्या पिढीमध्ये संतविचारांची रुजवणूक यांनाही या संकल्पनेत महत्त्व देण्यात आले आहे.

योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांच्या मते, हे मंदिर म्हणजे दगड-विटांची वास्तू नसून संतवाङ्मयाचे ज्ञानकेंद्र, वारकरी संस्कृतीचे विद्यापीठ आणि संस्कारांचे तीर्थक्षेत्र असेल.

पैठणमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, हा प्रकल्प साकारल्यास धार्मिक कार्यक्रम आणि संतपरंपरेशी निगडित उपक्रमांना नवी दिशा मिळू शकते. संत एकनाथ महाराजांनी आपल्या कार्यातून दिलेला समता, मानवता आणि भक्तीचा संदेश व्यापक समाजापर्यंत पोहोचविणे, हा या संकल्पनेमागील प्रमुख उद्देश आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

338 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क