माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या नांदेड येथील डॉ. मोहन उत्तमराव चव्हाण यांना औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. महंतांनी ठाकरे यांना प्रसाद आणि विभूती दिली होती. ठाकरे यांनी ती स्वीकारून शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिल्यामुळे, डॉ. चव्हाण यांनी यासंदर्भात नांदेडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार केली होती. मात्र, हे प्रकरण न्यायालयाने फेटाळले. नंतर सत्र न्यायालयानेही चव्हाण यांचे अपील फेटाळले.
चव्हाण यांनी त्यानंतर औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयात सहायक लोकअभियोक्ता प्रीती डिग्गीकर यांनी शासनातर्फे बाजू मांडली. न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी चव्हाण यांची याचिका फेटाळून दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि न्यायालयाच्या प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवला.
तक्रारीला कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, चव्हाण यांनी याचिका मागे घेतली असली तरी, त्यांना उद्धव ठाकरे यांना तीन आठवड्यांत दोन लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने ठाकरेंवरील आरोपांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L5VeaWe1xj1HEg4MmTSJ2Q
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*