छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे रूप देण्यासाठी महापालिकेने 61 इलेक्ट्रिक बस सेवेत आणण्याची तयारी सुरू केली आहे. जाधववाडी येथील स्मार्ट बस डेपोत सध्या या बस उभ्या असून, 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे या बस प्रत्यक्ष रस्त्यावर कधी धावणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
या ताफ्यात खासगी कंपनीकडून भाडेतत्त्वावर मिळालेल्या 34 वातानुकूलित बस आणि केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेतून प्राप्त झालेल्या 27 बसचा समावेश आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी या संदर्भात माहिती दिली.
बस मिळवण्यासाठी महापालिकेला करावा लागला पाठपुरावा
शहरासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया काही वर्षांपूर्वी सुरू झाली होती. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत हैदराबाद येथील ओलेक्ट्रा कंपनीकडून 35 बस भाडेकरारावर घेण्याचे ठरले होते. मात्र, कंपनीकडून सुरुवातीला केवळ एकच बस मिळाली. उर्वरित 34 बसचा पुरवठा बराच काळ रखडल्याने हा विषय प्रलंबित राहिला.
दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानाची मुदत संपल्यानंतर शहरातील बससेवा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित कंपनीला बसचा पुरवठा करण्यासाठी ठोस भूमिका घेतली. बस उपलब्ध न केल्यास अनामत रक्कम जप्त करण्याचा इशारा दिल्यानंतर कंपनीने मागील महिन्यात उर्वरित 34 बस महापालिकेला दिल्या.
100 बस मंजूर; सध्या 27 बस दाखल
पीएम ई-बस योजनेअंतर्गत महापालिकेला एकूण 100 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 27 बस प्राप्त झाल्या आहेत. या बसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम यापूर्वी 17 सप्टेंबर रोजी प्रस्तावित होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम रद्द झाल्याने लोकार्पण होऊ शकले नाही.
आता 1 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री शहरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने नव्याने नियोजन केले आहे. मात्र, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक नियमांची पूर्तता करावी लागणार आहे.
लोकार्पणानंतर या बस कोणत्या मार्गांवर धावणार आणि नियमित सेवा नेमकी कधी सुरू होणार, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना नव्या ई-बस सेवेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CF89MLzjXiJLRGIbwDr7te
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*