छत्रपती संभाजीनगर: मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली असून, तापमानात विक्रमी वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहिली होती, त्यामुळे आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. दिवस-रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत १.६ ते ३.२ अंशांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि दुपारच्या वेळी तापमान झपाट्याने वाढत आहे. सकाळी ८.३० वाजता २३ अंश सेल्सिअस असलेले तापमान अवघ्या साडेसहा तासांत १२ अंशांनी वाढून दुपारी ३५.४ अंशांवर पोहोचले. सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते आणि सायंकाळपर्यंत वातावरण तापलेलेच राहते.
दिवस-रात्रीच्या तापमानात वाढ
तापमानातील वाढीचा फटका कृषी, उद्योग, व्यवसाय, पर्यटन आणि आरोग्य क्षेत्रांना बसत आहे. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, थकवा, डिहायड्रेशनसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशापेक्षा परावर्तित उष्णता वातावरणात अधिक काळ अडकत असल्याने रात्रीही गरमी जाणवत आहे. परिणामी, किमान तापमानात ३ अंशांनी वाढ झाली आहे.
पुढील काही दिवस तापमान वाढीची शक्यता
हवामान तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्याची तीव्रता येत्या काही आठवड्यांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी साडेआठ वाजता २३ अंशांवर असलेले तापमान सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३२ अंशांवर गेले, त्यानंतर पुढील तीन तासांत ३५ अंशांवर पोहोचले. सायंकाळपर्यंतही तापमान उच्चस्तरावरच राहत आहे.
उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हात जाणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*