छत्रपती संभाजीनगर: शहराजवळ असलेल्या प्रति पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसावर एका नशेत तर्रर्र असलेल्या अर्धनग्न तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास चढून आरडाओरड करत कळस हलवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. मंदिर समितीच्या सतर्कतेमुळे पोलिसांना वेळीच माहिती मिळाली आणि मोठा अनर्थ टळला.

ही घटना गुरुवारी (6 मार्च) पहाटे 2.30 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा बिहारमधील असून तो नशेत मंदिराच्या कंपाउंडमधून आत घुसला. वॉचमनने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दगड मारण्यास सुरुवात केली आणि गाभाऱ्यावर जाऊन थेट कळसावर चढला. त्यानंतर त्याने कळस हलवून तोडण्याचा प्रयत्न केला.

मंदिराच्या सुरक्षारक्षकाने तात्काळ संस्थानच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य उपाययोजना करून संबंधित माथेफिरू तरुणाला सुखरूप खाली उतरवले आणि ताब्यात घेतले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील पवार यांनी सांगितले की, मंदिराचा पितळी कळस सुमारे पाच फूट उंचीचा असून तो लोखंडी रॉडने मजबुतीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे तो हलवणे शक्य नव्हते आणि मंदिराची कोणतीही हानी झालेली नाही.

संबंधित तरुण पंढरपूरमध्ये आपल्या साथीदारांसोबत राहत असल्याचे समजते. मात्र, त्याने कळसावर चढण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला आत्महत्या करायची होती की तो कळस चोरण्याच्या उद्देशाने चढला होता, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला किरकोळ जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, अद्याप या प्रकरणाची अधिकृत नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही. यामुळे या माथेफिरूचे नाव आणि गाव समजू शकलेले नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,308 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क