छत्रपती संभाजीनगर : परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला पिकअप व्हॅनची धडक बसून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी खंडेवाडी फाटा, बडवे कंपनीजवळ घडली.
यश सुभाष मधुरसे (वय १९, रा. बिडकीन) असे मृत तरुणाचे नाव असून, तो धनेश्वरी फार्मसी महाविद्यालयात डी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. सध्या चौथ्या सत्राच्या परीक्षा सुरू असून, यासाठी यश सकाळी ८ वाजता बिडकीनहून चित्तेगाव येथे मित्र ऋषिकेश शिंदे याला सोबत घेऊन कॉलेजकडे निघाला होता.
दरम्यान, बडवे कंपनीजवळील वळणावर अचानक ‘छोटा हत्ती’ (पिकअप व्हॅन) समोर आल्याने दुचाकीचा तोल गेल्याने यश थेट पिकअपच्या मागील भागावर आदळला. यामध्ये यशच्या डोक्याला गंभीर इजा झाली. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी यशला मृत घोषित केले. ऋषिकेश शिंदे गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद बिडकीन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी असे यशचे वर्णन शिक्षक आणि मित्रमंडळींनी केले. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*