छत्रपती संभाजीनगर : दीड दशकापासून प्रलंबित असलेला औट्रम घाट बोगदा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड येथील औट्रम घाटात रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या संयुक्त भागीदारीत १५ किलोमीटर लांबीचे चार बोगदे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
या बैठकीस रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे, गतिशक्ती मिशनचे अधिकारी आणि दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय आणि एनएचएआय प्रत्येकी ३५०० कोटी रुपये खर्च करणार असून, एकूण ७००० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
चार बोगद्यांपैकी एक रेल्वेसाठी, एक महामार्गासाठी
या बोगद्यांपैकी एक रेल्वे वाहतुकीसाठी, एक राष्ट्रीय महामार्गासाठी तर उर्वरित दोन बोगदे सुरक्षिततेच्या दृष्टीने राखीव ठेवले जाणार आहेत. बोगद्यांच्या उभारणीमुळे सध्या ११० किलोमीटरचा फेरमार्ग टाळता येणार असून, सध्या रोज सुमारे २२ हजार वाहने या मार्गावरून जात आहेत. भविष्यात उद्योग विस्तारामुळे ही संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्याचा दळणवळणासाठी मोठा टप्पा
या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक आणि दळणवळण क्षेत्राला मोठा चालना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव, पुढे सोलापूरपर्यंतचा रेल्वे मार्ग देखील या बोगद्यांच्या माध्यमातून जोडला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
डीपीआर आणि निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात
डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करण्यासाठी दोन्ही मंत्रालयांनी अर्धा-अर्धा खर्च उचलण्याचे निश्चित केले असून, काही महिन्यांत निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या निर्णयामुळे चाळीसगाव रेल्वे मार्गाचाही मार्ग मोकळा झाला असून, संपूर्ण प्रकल्प मराठवाड्याच्या दळणवळण विकासासाठी मोलाचा ठरणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*