छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (१३ मे) जाहीर झाला असून, विभागात बीड जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. तर दुसऱ्या स्थानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने आपली जागा राखली आहे. विशेष म्हणजे यंदा मुलींनी मुलांपेक्षा जास्त यश संपादन करत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या निकालाची घोषणा विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे आणि सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी पत्रकार परिषदेत केली. जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातून एकूण १,८५,४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला होता. यापैकी १,८३,९५७ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि त्यामधील १,७०,७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागाचा एकूण निकाल ९२.८२ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.३७ टक्क्यांनी घटला आहे. या घसरणीचे कारण ‘कॉपीमुक्त अभियान’ असल्याचे मंडळाने सांगितले.
जिल्हानिहाय निकाल :
बीड : ४१,५४१ पैकी ४०,९७७ विद्यार्थी उत्तीर्ण – ९६.४७%
छत्रपती संभाजीनगर : ६६,६२६ पैकी ६२,३६६ विद्यार्थी उत्तीर्ण – ९३.६०%
हिंगोली : १५,६१३ पैकी १३,९०८ विद्यार्थी उत्तीर्ण – ८९.८२%
परभणी : २८,५९२ पैकी २५,५१६ विद्यार्थी उत्तीर्ण – ८९.२४%
जालना : ३१,५८५ पैकी २८,८८३ विद्यार्थी उत्तीर्ण – ८९.०७%
मुली ठरल्या यंदाही यशस्वी :
विभागात एकूण १,०२,७२७ मुलांनी परीक्षा दिली, त्यापैकी ९३,१७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.७०% होते. तर ८१,२३० मुलींमध्ये ७७,५७६ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५०% आहे. म्हणजेच मुलांपेक्षा मुलींचा निकाल ४.८ टक्क्यांनी अधिक आहे.
दरवर्षीच्या तुलनेत निकालात घसरण झाली असली, तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. शिक्षणात गुणवत्ता टिकवण्यासाठी यंदाच्या निकालाने नवा मापदंड उभा केला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*