छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठ परिसर व धाराशिव उपपरिसरातील एकूण ४५ विभागांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून, यंदाही ‘सीईटी’ परीक्षा होणार नाही.
५ जून ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ई-समर्थ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेसाठी खुल्या प्रवर्गासाठी २०० रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाईल.
१ जुलै रोजी सर्व नोंदणीची माहिती संबंधित विभागांकडे सुपुर्द करण्यात येईल. यानंतर विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. विभागांकडून १४ जुलै रोजी छाननी प्रक्रिया पूर्ण होईल.
१७ जुलै रोजी सामान्य गुणवत्ता यादी, तर आक्षेपानंतर २१ जुलै रोजी सुधारित यादी जाहीर होणार आहे. अंतिम निवड यादी २२ जुलै रोजी प्रसिद्ध होईल आणि २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
विद्यापीठ परिसरातील ४३ विभागांमध्ये पदव्युत्तरच्या ५४ अभ्यासक्रमांसाठी २,२२८ जागा उपलब्ध आहेत. उपकुलसचिव माधव वागतकर यांनी सांगितले की, यंदा काही नवीन अभ्यासक्रमही मंजूर झाले असून, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र मिळून ६० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळेत नोंदणी करून कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*