छत्रपती संभाजीनगर: राज्यातील शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वीच शिक्षण विभाग आणि बालभारतीने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. यंदा इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून त्यानुसार नव्या पाठ्यपुस्तकांची छपाई आणि वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) यांच्यामार्फत सर्व पुस्तके शिक्षण विभागाला सुपूर्त करण्यात आली आहेत. १६ जून रोजी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी यंदा एकूण ७,८८,११४ पाठ्यपुस्तकांची मागणी होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली असून पुस्तके विभागीय केंद्रांमार्फत जिल्हा परिषद व महापालिकेच्या मागणीनुसार शाळांमध्ये पोहोचवण्यात आली आहेत.
पहिली ते आठवी इयत्तेतील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. संभाजीनगर राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राकडे चार जिल्हे आणि एका महापालिकेकडून एकूण ६३ लाख ८३ हजार ४९२ पुस्तके मागवण्यात आली होती.
सध्या शाळा व परिसरातील भागांमध्ये पुस्तके वितरित करण्याचे काम सुरू असून यंदा विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके मिळणार असल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*