छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) २०२६ ही परीक्षा २१ जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील ५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून, यामध्ये शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील ३ केंद्रांचा समावेश आहे. यंदा जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ७३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

परीक्षेच्या नियोजन आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या समन्वयाने आणि दक्षतेने पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नीट परीक्षा दुपारी २ ते ५.१५ या वेळेत होणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, कार्यकारी दंडाधिकारी आणि पोलीस बंदोबस्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रांच्या परिसरावर ड्रोनद्वारे विशेष नजर ठेवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या सोयी-सुविधांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवरून परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांवर विशेष मदत व आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.

परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांची बायोमेट्रिक पडताळणी आणि उपस्थिती नोंदविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेशपत्रावरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

बैठकीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नोडल अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, विजय चव्हाण, प्रवीण फुलारी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर तसेच महावितरण विभागाचे अधिकारी आणि परीक्षा समन्वयक उपस्थित होते.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

502 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क