पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात रविवारचा सुट्टीचा दिवस काही पर्यटकांसाठी घातक ठरला. इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा येथील जुना साकव पूल अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, अंदाजे २० ते २५ पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कुंडमाळा हा तळेगाव दाभाडे आणि देहू गावाच्या दरम्यानचा भाग असून, येथे इंद्रायणी नदीकाठी वर्षविधी व इतर धार्मिक कार्यासाठी पर्यटकांची गर्दी नेहमीच असते. आज दुपारी सुद्धा येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्या वेळी पुलावर उभे राहून अनेक जण पाण्याचा आनंद घेत होते. मात्र अचानक लोखंडी व काँक्रीटचा पूल कोसळला आणि त्यावर असलेले सर्वजण नदीत कोसळले.
घटनास्थळी तातडीने पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे. काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेत जलप्रवाहात अडकलेल्या काही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवाहाचा वेग अधिक असल्याने अनेकजण वाहून गेले.
या पुलाची स्थिती अत्यंत जीर्ण झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्याठिकाणी जुना पूल असल्याचा फलकही लावण्यात आला होता. तरीही प्रशासनाने योग्य ती दुरुस्ती न करता वाहतूक सुरू ठेवली होती, हे विशेष लक्षवेधी आहे. वाहतूक नियंत्रणाची कोणतीही उपाययोजना येथे नसल्यामुळे ही दुर्घटना टाळता आली नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या पाण्यात वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू असून मृतांची अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे. प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप होत असून या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/LUuxEbTCGUGCYza17DWFVv
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*