नवी दिल्ली : “दुचाकी वाहनांवर टोल आकारला जाणार” अशा बातम्यांनी देशभरात खळबळ उडवली असतानाच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी या बातम्या पूर्णपणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचं जाहीर करत दुचाकीस्वारांना दिलासा दिला आहे.
गडकरी यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, “काही मीडिया हाऊस दुचाकी वाहनांवर टोल लावण्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवत आहेत. असा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही. दुचाकींना टोल सवलत यापुढेही कायम राहील. अशा प्रकारच्या अपुऱ्या माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध करणे ही निरोगी पत्रकारितेची ओळख नाही. मी अशा वृत्तांचा निषेध करतो.”
यासोबतच, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने देखील यावर अधिकृत निवेदन जारी करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. NHAI ने स्पष्ट केले की, “दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याची कोणतीही योजना नाही आणि सध्या तरी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीनही नाही.”
दरम्यान, काही माध्यमांमध्ये अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली होती की, १५ जुलै २०२५ पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकींवर टोल वसूल केला जाणार आहे. परंतु आता अधिकृतरित्या हे स्पष्ट झाले आहे की, दुचाकीस्वारांसाठी टोलमुक्त सुविधा पूर्ववतच राहणार आहे.
दुचाकी वापरकर्त्यांना कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, कारण सरकारने स्पष्ट केले आहे की, टोल सवलत कायम राहणार आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*