छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील ६० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या विकासासाठी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी (२९ जून) सकाळी पुन्हा जोमात सुरू होणार आहे. यावेळी मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौकदरम्यान फक्त व्यावसायिक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार असून, निवासी मालमत्तांना १५ ऑगस्टपर्यंत दिलासा देण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी महापालिकेचे ३५० अधिकारी व कर्मचारी, तसेच ४०० पोलिस कर्मचारी व अधिकारी सकाळी ९ वाजता या भागात उपस्थित राहणार आहेत. यामध्ये २ सहाय्यक पोलिस आयुक्त, ६ निरीक्षक, २० सहाय्यक निरीक्षक, ३०० पोलीस अंमलदार, आणि १०० दंगा नियंत्रण पथकाचे जवान सहभागी होतील.
महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले की, न्यायालयाने काही निवासी मालमत्ताधारकांना १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे सध्या कोणतीही निवासी मालमत्ता हटवली जाणार नाही. मात्र, व्यावसायिक अतिक्रमणांवर कोणताही स्थगिती आदेश नसल्यामुळे कारवाई निश्चित आहे.
या कारवाईपूर्वी महापालिकेने सर्व संबंधित व्यावसायिकांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. परंतु अनेकांनी ते न पाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात यंत्रणा उतरवून थेट कारवाई करण्यात येणार आहे.
६० मीटरच्या आत येणाऱ्या व्यावसायिक मालमत्ता हटवण्यात येतील, तर त्यानंतरच्या क्षेत्रातील अतिक्रमणधारकांना गुंठेवारी योजनेंतर्गत पैसे भरून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची संधी दिली जाणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेवर पोलीस आणि महापालिकेचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे. नागरिकांनी शांतता पाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KOOzOvmJm8UAlKfzgNGy49
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*