छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण रोड चौपदरीकरण प्रकल्पासाठी मंगळवारी (दि. १ जुलै) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत एकाच दिवशी ३६२ अनधिकृत बांधकामे हटवली. नक्षत्रवाडीतील महापालिका हद्दीपासून ते रेल्वेस्टेशन उड्डाणपुलापर्यंत रस्त्यावर अडथळा ठरणारी हॉटेल्स, लॉज, दुकाने, शेड, जाहिरात फलक, गॅरेज, कमानी, संरक्षण भिंती अशा विविध प्रकारची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली.

या कारवाईमुळे शेकडो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. घरात खेळणारी चिमुरडी मंडळी रडवेल्या चेहऱ्याने ढिगाऱ्यावर बसलेली दिसली. महिलांनी रडत रस्त्यावर टाहो फोडला, “आता कुठे जाऊ? कुठे राहू?” असा सवाल करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कांचनवाडीतील दोन मजली इमारती देखील या कारवाईत उद्ध्वस्त झाल्या. ढिगाऱ्यावर बसून हुंदके देणाऱ्या नागरिकांचे चित्र पाहून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी माहिती दिली की, “पैठण रोड ६० मीटर रुंदीचा करण्यात येत असून, महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीपर्यंत दोन्ही बाजूंनी ११ किमी अंतरावरील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. बुधवारी (दि.२) मात्र कारवाई स्थगित करण्यात आली असून, त्या दिवशी कोणतीही तोडफोड होणार नाही.”

कारवाई दरम्यान नक्षत्रवाडीतील वक्फ बोर्डाच्या जागेवर राहणाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम देखील हटवण्यात आले. रहिवाशांनी वक्फ बोर्डाकडे परवानगी मागितली होती, मात्र बोर्डाने ती नाकारल्यामुळे कारवाई टाळता आली नाही, अशी माहितीही वाहुळे यांनी दिली.

विशेष म्हणजे या कारवाईत बेंचमार्क नावाच्या खासगी विश्रामगृहाचे तारेचे कुंपण आणि दोन इंची पाइपलाइन देखील हटवण्यात आली. त्यामुळे नक्षत्रवाडी जलकुंभाचे पाणी काही काळ बंद ठेवावे लागले. पेट्रोल पंप, राजकीय पुढाऱ्यांचे प्लॉट आणि श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मालकीच्या जागांवर असलेल्या संरक्षण भिंतीही यावेळी उद्ध्वस्त करण्यात आल्या.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,009 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क