छत्रपती संभाजीनगरजवळील प्रती पंढरपूर येथे येत्या आषाढी एकादशीनिमित्त 10 ते 12 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, “प्रत्येक भाविक हा व्हीआयपी आहे, या भावनेतून सेवा देण्यात यावी.” भाविकांना स्वच्छता, सुरक्षा आणि आवश्यक सेवा मिळाव्यात यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. मंदिर परिसरात विक्री स्टॉल व फिरत्या विक्रेत्यांमुळे त्रास होऊ नये, यासाठी नियंत्रण ठेवण्याचे आदेशही देण्यात आले.
आरोग्य विभागाने २४ तास ॲम्बुलन्स, डॉक्टर, नर्स उपलब्ध ठेवाव्यात तसेच रक्तदान शिबिर राबवावे. अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवावे. विद्युत विभागाने रहाटपाळणे व इतर जोडण्यांना परवाने देताना दक्षता घ्यावी. तसेच रात्रीच्या वेळी निगराणीसाठी विशेष पथके तयार ठेवावीत.
पोलीस विभागाने महिला आणि बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत साध्या वेशातील पोलीस तैनात करावेत. सीसीटीव्ही, ध्वनीक्षेपण आणि दिशादर्शक फलक यांचा वापर करून भाविकांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. वाहतूक शाखेने जड वाहनांसाठी पर्यायी रस्ता तयार करावा. ए.एस.क्लब येथे २४ तास मार्गदर्शक आणि थांबा उपलब्ध करून देण्यात यावा.
यात्रा संपल्यानंतर महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवावी व यात्रा काळात फिरते शौचालये उपलब्ध करून द्यावीत, अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्रशासन भाविकांना सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*