छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग देत महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पडेगाव रोडवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या दिवशी २७२ अनधिकृत मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. गुरुवारी ५८५ बांधकामांवर कारवाई झाली होती. त्यामुळे दोन्ही दिवसांत एकूण ८५७ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून रस्ता आता २०० फूट रुंद करण्यात यश आले आहे.

पडेगाव ते दौलताबाद टी पॉईंट हा महामार्ग असून, महापालिका हद्दीत याची प्रस्तावित रुंदी ६० मीटर आहे. सध्या हा रस्ता ३० मीटर असून उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली होती. यापैकी अनेक इमारती दोन ते तीन मजली होत्या. या सगळ्या बांधकामांवर मनपाकडून कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती.

या कारवाईत २५ जेसीबी, ५ पोकलेन, १५ टिप्पर, २ रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आणि २ फिरते कोंडवाडे वापरण्यात आले. महापालिका प्रशासनाकडून ३५० कर्मचारी आणि पोलिस दलाकडून २५० कर्मचारी या कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्वतः कारवाईची पाहणी केली असून अतिक्रमण हटाव विभागप्रमुख संतोष वाहूलेही यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, शनिवार (मोहरम) आणि रविवार (आषाढी एकादशी) हे दोन दिवस पोलीस बंदोबस्ताच्या कारणास्तव कारवाईस विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, सोमवारी (७ जुलै) महत्त्वाची कारवाई जळगाव रोडवर करण्यात येणार आहे.

वसंतराव नाईक चौक ते हसूल टी पॉईंटदरम्यान डाव्या बाजूला सर्व्हिस रोड आहे, मात्र विरुद्ध दिशेला सर्व्हिस रोड नाही. त्यामुळे तिथे ६० मीटर रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी मनपाने नियोजन सुरू केले असून, अपघातप्रवण ठिकाणांपैकी असलेल्या काळा गणपती मंदिरासमोरील रस्ता विशेष लक्षात घेण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, विकास आराखड्यात नमूद असलेल्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे कोणतीही परवानगी नसल्याने पाडली जात आहेत. बांधकाम परवानगी किंवा गुंठेवारी घेतली असती तर ही मालमत्ता वाचवता आली असती, असे प्रशासकांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, रुंदीकरणानंतर लगेच रस्ते तयार होतील, असे नक्की नाही, मात्र भूसंपादनासाठी लागणारा निधी बेटरमेंट चार्जेसमधून उभारला जाईल.

सोमवारीची ही कारवाई मोठ्या प्रमाणावर होणार असून, स्थानिक नागरिक व मालमत्ताधारकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,409 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क