छत्रपती संभाजीनगर : शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत झेप घेतली असून, एअरपोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (एएआय) ग्राहक समाधान सर्वेक्षणात (सीएसएस) ६० विमानतळांपैकी आठवे स्थान पटकावले आहे. या सर्वेक्षणात चिकलठाणा विमानतळाला ५ पैकी ४.९३ रेटिंग मिळाली असून, यंदा विमानतळाने ०.०६ गुणांनी सुधारणा नोंदवली आहे.
दरवर्षी एएआयच्या वतीने देशभरातील विमानतळांचे ३३ निकषांवर मूल्यांकन केले जाते. यात स्वच्छता, पार्किंग, चेक-इन प्रक्रिया, सुविधा आणि प्रवाशांच्या एकूण अनुभवावर आधारित गुणांकन दिले जाते. २०२४ मध्ये ४.८७ रेटिंगसह १३व्या स्थानावर असलेल्या चिकलठाणा विमानतळाने यंदा थेट ‘टॉप-१०’मध्ये स्थान मिळवत आठव्या क्रमांकावर मजल मारली.
विमानतळ संचालक शरद येवले यांनी सांगितले की, “२०२५ मध्ये करण्यात आलेल्या नवीन सुविधांमुळे हे यश शक्य झाले आहे. टर्मिनल इमारतीतील सर्व ११ स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, पार्किंग क्षेत्रात ईव्ही चार्जिंग स्टेशनची सुविधा, लहान मुलांसाठी चाइल्ड प्ले एरिया यांसारख्या सुधारणांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच, प्रवासी हाताळण्याची क्षमता ८०० वरून २,८५० पर्यंत वाढवली आहे. विमानतळाला आणखी उंची गाठण्यासाठी स्वच्छता, कार्यक्षमता आणि प्रवासी-अनुकूल सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित आहे.”
या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट प्रवाशांच्या अभिप्रायावर आधारित विमानतळ सेवांमध्ये सातत्याने सुधारणा करणे आहे. स्वच्छता, पार्किंग आणि चेक-इनसह अनेक बाबतीत प्रवाशांनी चिकलठाणा विमानतळाचे कौतुक केले असून, यामुळे शहराची प्रतिष्ठा वाढली आहे. आता पुढील काळात दिवसभरात १०० उड्डाणांची क्षमता प्रभावीपणे वापरण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*