छत्रपती संभाजीनगर: आरोग्याचे संकट केव्हा आणि कोणाच्या आयुष्यात उभे राहील याचा अंदाज नसतो. विशेषतः हृदयविकार, कर्करोग, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया किंवा अपघातातील आपत्कालीन उपचार यांसारख्या खर्चिक आजारांमुळे सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका बसतो. अशा वेळी गरजू रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी जीवनरक्षक ठरतो. या योजनेअंतर्गत जानेवारी ते २१ जुलै २०२५ या सहा महिन्यांत ७२२ रुग्णांना तब्बल ६ कोटी ४ लाख ९७ हजार ५०० रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
यापूर्वी या निधीसाठी मुंबई गाठावी लागायची, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आता प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहायता निधी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कक्ष १ जानेवारी २०२५ पासून कार्यान्वित असून १ मे रोजी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. कक्षाचे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गोरे असून, सर्व अर्जांची तातडीने पडताळणी करून मुंबईकडे पाठवण्याची प्रक्रिया या कक्षातून केली जाते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
या कालावधीत जानेवारीत ६९ रुग्णांना ६२ लाख ५ हजार, फेब्रुवारीत ८२ रुग्णांना ७१ लाख ३५ हजार, मार्चमध्ये ९९ रुग्णांना ८३ लाख, एप्रिलमध्ये १११ रुग्णांना ९५ लाख २२ हजार ५००, मेमध्ये १३८ रुग्णांना १ कोटी ११ लाख ३० हजार, जूनमध्ये १३४ रुग्णांना १ कोटी १० लाख ४५ हजार तर जुलै महिन्यात (२१ तारखेपर्यंत) ८९ रुग्णांना ७१ लाख ६० हजार रुपये अशी मदत दिली गेली. विशेष म्हणजे, जिल्हा कक्ष सुरू झाल्यानंतर मदतीच्या प्रमाणात चारपट वाढ झाली आहे.
मदतपात्र आजार आणि सुविधा
या निधीतून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि हात प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, औषधोपचार व किरणोपचार, अस्थिबंधन, गुडघा व खुब्या प्रत्यारोपण, जळीत व विद्युतजळीत रुग्णांचे उपचार, डायलिसिस, नवजात शिशूंचे गंभीर आजार, अपघातातील शस्त्रक्रिया व महागड्या ऑर्थोपेडिक उपचार यांसारख्या गंभीर आजारांवरील खर्चिक उपचारांसाठी मदत मिळते. मदत मिळाली नाही तर रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याबद्दल मार्गदर्शन दिले जाते.
अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे
- अर्जदारांनी निधीसाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात –
- विहित नमुन्यातील अर्ज
- रुग्ण दाखल असल्याचे स्थाननिश्चिती (जीओ-टॅग) छायाचित्र
- उपचार खर्चाचे अंदाजपत्रक (खासगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक प्रमाणपत्र)
- तहसीलदाराकडून वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला
- आधारकार्ड
- निदानात्मक कागदपत्रे
- अपघातग्रस्तांसाठी पोलिसांचा एफआयआर
- प्रत्यारोपणासाठी विभागीय समितीचा अहवाल
अर्ज ई-मेलद्वारे ([email protected]) सादर करता येतो आणि सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात पाठवावी लागतात. टोल-फ्री क्रमांक 18001232211 वर संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येते.
अधिक माहितीसाठी संपर्क: डॉ. बालाजी गोरे – 9765866619, श्री. श्याम वाकळे – 8275925146.
या योजनेमुळे गरजू रुग्णांना त्वरीत व मोफत आर्थिक मदत मिळून त्यांचे प्राण वाचवण्याचे कार्य होत असून, ही योजना खऱ्या अर्थाने जनतेच्या आरोग्याचे कवच ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*