छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील जायकवाडी धरणाने ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा गाठत नव्वदीचा टप्पा पार केला आहे. बुधवारी (दि. ३० जुलै) रात्री १२ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी १५२०.२४ फूट इतकी झाली असून, ही पातळी ९०.४५ टक्के साठ्यापर्यंत पोहोचली आहे. धरणाच्या ऊर्ध्व भागातून १६,२३० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (३१ जुलै) दुपारी तीन वाजता जलपूजन करून धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार असून, गोदावरी नदीपात्रात अधिकृतरित्या विसर्ग सुरू होणार आहे. यावेळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमानवार प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. विशेष म्हणजे, जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडण्याची ही ऐतिहासिक पहिली वेळ ठरणार आहे.

यंदा पावसाचा जोर मुख्यतः ऊर्ध्व भागात म्हणजेच नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक राहिल्याने तेथील धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. भंडारदरा, निळवंडे, दारणा, नांदूर मधमेश्वर, गंगापूर, पालखेड आणि कडवा या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गोदावरी नदीतून जायकवाडीकडे येत आहे. बुधवारी सकाळी २३,७९६ क्युसेकने सुरू झालेली आवक रात्री १६,२३० क्युसेकवर स्थिरावली.

१ जूनपासून आतापर्यंत धरणात ४२ टीएमसीहून अधिक पाण्याची आवक नोंदवली गेली आहे. अजूनही दोन महिने पावसाळा उरलेला असून, धरणातील दरवाजे पुढील काळात पुन्हा उघडावे लागण्याची शक्यता जलतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,132 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क