छत्रपती संभाजीनगर : आता नागरिकांना सरकारी दाखले, प्रमाणपत्रे आणि इतर सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने ‘सेवादूत’ हे मोबाईल ॲप तयार करून घरपोच सेवा देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद दिवेकर यांनी सांगितले की, ‘सेवादूत’ या ॲपद्वारे महाऑनलाईनच्या ८५८ सेवा नागरिकांना उपलब्ध होतील. प्लेस्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून, आधार व मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करावी लागेल. यानंतर इच्छित सेवा निवडून, संबंधित माहिती भरावी लागेल. ही माहिती जिल्हा डेटासेंटरकडे जाईल आणि नजीकच्या सेवा केंद्राकडे पाठवली जाईल.
सेवा केंद्राचा प्रतिनिधी संबंधित नागरिकाच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून, स्कॅन करून ती अपलोड करेल. त्यानंतर संबंधित सेवा घरपोच पुरवली जाईल. या सेवेसाठी १०० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
ही सेवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तसेच आजारी व्यक्तींसाठी विशेष फायदेशीर ठरणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रशासन भविष्यात आणखी सुविधा डिजिटली उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*