छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांना आधीच ८ ते ९ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असताना, आता तो १० दिवसांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फारोळा येथील २६ एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राला वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सहा तासांचा शटडाऊन घेतला. त्यामुळे शहरातील ७०० मिमी आणि १२०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या बंद राहिल्या, परिणामी अनेक भागांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पाण्याचा नियमित पुरवठा विस्कळीत झालेला आहे. या शटडाऊनमुळे पाणीटंचाई अधिक गंभीर झाली असून काही नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, तर काहींना महाग दराने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

शुक्रवारीच जलशुद्धीकरण केंद्राच्या पंपगृहात बिघाड झाल्याने चार तास पुरवठा बंद होता, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी वीजजोडणीसाठी पुन्हा सहा तासांचा शटडाऊन झाला. परिणामी, ज्या भागात शुक्रवारी पाणी येण्याची अपेक्षा होती, तिथे आता रविवारी (३ ऑगस्ट) पाणी येणार आहे. तर सोमवारी ज्या भागात पाणी येणार होते, तिथे पाणी बुधवारी किंवा गुरुवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिकेचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी माहिती दिली की, महावितरणने वीज जोडणीचे काम पूर्ण केले असून सायंकाळपासून जलकुंभ भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारीपासून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार असून नव्या केंद्रामुळे भविष्यात टप्प्यांतील अंतर कमी होईल व पाणीपुरवठा नियमित केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/ISo4UL1PjcX2BKGJmHPT79?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

636 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क