छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेस आता अधिक सुनियोजित पद्धतीने हाताळण्याचे आदेश पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. अतिक्रमण हटवताना थेट कारवाई न करता आधी नोटीस बजावावी, मालमत्तांवर मार्किंग करावी, आणि स्थानिक नागरिकांकडून आक्षेप आल्यास पोलिस आणि मनपा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने त्यांच्या शंका स्पष्ट कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

बुधवारी दुपारी पोलिस आयुक्तालयात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत अतिक्रमण मोहीम व पीपीपी तत्वावरील डिजिटल पार्किंग प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गुरुवारपासून जटवाडा, बाबा चौक ते दिल्ली गेट, चंपा चौक भागात अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात येणार असून, याठिकाणी पोलिस बंदोबस्तात मार्किंगची प्रक्रिया सुरु होईल. विरोध झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चेतून मार्ग काढण्याचे नियोजन आहे.

हर्सूल येथे २०० फूट रुंद रस्ता करण्याच्या योजनेत सुमारे ३०० मालमत्ता बाधित होत आहेत. यातील २७ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. हर्सूल परिसरात वाढत्या विरोधामुळे भूसंपादनाच्या माध्यमातून मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारवाईपूर्वी सर्व तांत्रिक माहिती पोलिसांना देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मनपाच्या नागरी मित्र पथकातील माजी सैनिक हे पोलिसांच्या मार्गदर्शनाखालीच कारवाईसाठी सहभागी होतील. मात्र, त्यांना स्वबळावर कोणतीही कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. नारेगावमधील घटनेनंतर त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला.

वाळूज एमआयडीसीमधील अतिक्रमण हटवताना केवळ ७५ पोलिसांच्या बंदोबस्तात मोहीम यशस्वी झाली. याआधी अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी संवाद साधून कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

१५ ऑगस्टनंतर विविध सण सुरू होणार असल्याने बंदोबस्त उपलब्ध नसेल, त्यामुळे नियोजित मोहिमा लवकरच पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,626 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क