छत्रपती संभाजीनगर – शहर आणि जिल्ह्यात शनिवारी (दि.९) रात्रीपासून रविवारी (दि.१०) पर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. शनिवारी रात्री अकरा ते पहाटे एक या दोन तासांत मुसळधार पाऊस कोसळला. चिकलठाणा हवामान वेधशाळेच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री शहर परिसरात २५ मिमी, तर रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत १४ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान सहायक सुनील निकाळजे यांनी ही माहिती दिली.
शनिवारी रात्री पावसाचा जोर इतका होता की रस्त्यांवरून पाटापाण्यासारखा पाणीप्रवाह वाहत होता. सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. शिवाजीनगरच्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. भिंतींमधून रस्त्यावर धबधब्यासारखे पाणी कोसळत होते. शहरातील विविध ठिकाणी पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिटमिटा-पडेगाव, छावणी, बेमगपुरा, विद्यापीठ परिसर, सिटीचौक, औरंगपुरा, शहागंज, राजा बाजार, सराफा, मछलीखडक, पैठणगेट, क्रांती चौक, उस्मानपुरा, गारखेडा, देवळाली, सातारा, शिवाजीनगर, जवाहर कॉलनी आणि मुकुंदवाडी-चिकलठाणा या भागांत रविवारी पावसाने जोरदार तडाखा दिला. जिल्ह्यातील सारोळा, गौताळा, वेरूळ, घृष्णेश्वर, दौलताबाद, खुलताबाद येथेही पावसाने हजेरी लावली. जिल्हाभर झालेल्या पावसामुळे खरिपाची पिके मोहरली असून, शेतकरी खत देणे, खुरपणी आणि कोळपणीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
हवामान विभागाने सोमवारी (दि.११) छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यात आकाश ढगाळ राहून विजांसह हलक्या सरी पडण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे.
दरम्यान, एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेने गेल्या २४ तासांत २१.४ मिमी पावसाची नोंद केली आहे. एमजीएम गांधेली वेधशाळेत ३२.६ मिमी, तर एमजीएम पडेगाव स्कूल हवामान वेधशाळेत १९.८ मिमी पाऊस नोंदविण्यात आला असल्याचे श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*