छत्रपती संभाजीनगर : यंदा १५ ऑगस्ट रोजी दोन महत्त्वाचे दिवस एकाचवेळी साजरे होत आहेत – देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी. दरवर्षी गोकुळ अष्टमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून शहरातील मांस विक्री व जनावरांची कत्तल बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात. मात्र यंदा जन्माष्टमी १५ ऑगस्टला आल्याने आणि या दिवशी राष्ट्रीय सणही असल्याने, महापालिकेने १४ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपासून ते १५ ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत मांस विक्रीवर पूर्णतः बंदी जाहीर केली आहे. याचबरोबर २० ऑगस्ट रोजी जैन धर्मीयांचे पर्युषण पर्वारंभ असल्याने त्या दिवशीही मांस विक्री, कोंबडी व इतर मांस उत्पादने विक्री तसेच कत्तलखाने बंद राहणार आहेत.
महापालिकेच्या आदेशानुसार या दोन्ही दिवशी शहरातील मटण दुकाने, हॉटेल्स आणि मांस विक्रीसंबंधित सर्व आस्थापना बंद राहतील. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी घालण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शेख शाहेद यांनी दिला आहे.
शहरात गोकुळ अष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. विविध भागांतील मंदिरांमध्ये व सांस्कृतिक मंडळांकडून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दहीहंडी स्पर्धाही रंगतदार वातावरणात पार पडतात. महापालिकेच्या मते, धार्मिक सौहार्द, स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी ही बंदी आवश्यक आहे.
मात्र, या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील मालेगाव, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांनीही याच पद्धतीचे आदेश दिले आहेत. विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेतला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “ज्या वेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो, त्या वेळेस अशी बंदी घालतात. पण स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, यासाठी मांसाहारावर बंदी घालणे उचित नाही.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली. “स्वातंत्र्यदिनी काय खायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. नागरिकांनी शाकाहारी किंवा मांसाहारी खायचे की नाही, हे त्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. या दिवशी कुणी काय खायचे हे ठरवणारे तुम्ही कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा आदेश धार्मिक परंपरेच्या पार्श्वभूमीवर दिला असला तरी, त्यात राष्ट्रीय सणाचाही समावेश झाल्याने आता हा विषय धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*