छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको एन-७ परिसरात रविवारी (दि. १७) सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल १४ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी केले. ही घटना मुकुल मंदिर शाळेजवळ घडली असून, जखमींमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सुटीचा दिवस असल्याने नागरिक संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. काही ठिकाणी लहान मुले आणि तरुण खेळत होते. त्याचवेळी पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक लोकांवर हल्ला चढवला. पाहता पाहता तो दिसेल त्याच्यावर चावा घेऊ लागला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या नागरिकांच्या आरडाओरडीनंतर काही स्थानिक रहिवाशांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र तांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ पुढाकार घेत जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवले. तसेच मनपाच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून डॉग स्क्वॉडची मागणी केली. मात्र, रविवारी सुटी असल्याचे कारण देत मनपाने ‘डॉग व्हॅन सोमवारी पाठवू’ असे सांगितले. त्यामुळे उशिरापर्यंत डॉग स्क्वॉड घटनास्थळी पोहोचले नव्हते.
या घटनेनंतर मुकुल मंदिर शाळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालकांनी खबरदारी म्हणून मुलांना घराबाहेर न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार होणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, मनपाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*