छत्रपती संभाजीनगर : आज गणेश चतुर्थी निमित्त घराघरांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना होत असून शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रस्ते, सोसायट्या, गल्लीबोळ दुमदुमले आहेत. सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. फुलं, माळा, मातीच्या मूर्ती, सजावटीची साहित्ये, मोदक-करंजी यांचा सुगंध हवेत दरवळत आहे.
यंदा गणेश चतुर्थीचा शुभमुहूर्त दुपारी १.५४ वाजता सुरू होऊन बुधवार, २७ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४३ वाजेपर्यंत राहणार आहे. श्रींच्या पूजेचा उत्तम मुहूर्त सकाळी ११.०५ ते दुपारी १.४० वाजेपर्यंत आहे. याच वेळेत शहरातील अनेक कुटुंबे बाप्पाची प्रतिष्ठापना करणार आहेत.
कोकणातल्या गावाकडे जाणाऱ्यांची मोठी गर्दी गेल्या काही दिवसांपासून दिसत असली तरी संभाजीनगरातही गणेशोत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही. शहरातील प्रमुख मंडळांनी आकर्षक मखरे उभारले असून सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटींनाही प्राधान्य दिलं आहे. काही मंडळांनी पाणी बचतीचा संदेश दिला तर काहींनी प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
दुपारी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये फुलं, हार, झेंडूची पाकळी, कमळ आणि मोगऱ्यांच्या माळांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग दिसून येत आहे. गणपती प्रतिष्ठापनेसाठी लागणारे पूजासाहित्य घेण्यासाठी दुकानदारांकडे रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसाठी कडक सुरक्षा केली असून शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी सजलेलं संभाजीनगर आता दहा दिवस बाप्पामय होणार आहे. प्रत्येक घरात मंगलमय वातावरण पसरलं असून, भक्ती, आनंद आणि उत्साहाचा संगम शहराच्या कानाकोपऱ्यात अनुभवायला मिळतोय.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*