मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनाला अखेर मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी केवळ एका दिवसापुरतीच असून त्यावर काही अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या आदेशानुसार हे आंदोलन सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंतच करता येणार आहे.
गणेशोत्सव सुरू असल्यामुळे या आंदोलनादरम्यान वाहतुकीला अडथळा येऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. आंदोलनकर्त्यांनी शांतता राखणे बंधनकारक असून कायद्याचे उल्लंघन झाल्यास परवानगी रद्द होऊ शकते.
या आंदोलनासाठी मनोज जरांगे यांच्यासोबत केवळ पाच हजार आंदोलकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. यापूर्वी या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र आता पोलिसांनी अटींसह हिरवा कंदील दाखवला आहे.
सरकारने एका दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. “आम्ही सरकारच्या अटी मान्य करतो, पण त्यांनीही आमच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात,” असे जरांगे यांनी स्पष्ट केले. त्यांनी इशारा दिला की, मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन उठवले जाणार नाही.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांच्या मुख्य अटी
- आंदोलनाला एका वेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी असेल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही.
- ठराविक वाहनांनाच परवानगी असेल. वाहनांची पार्किंग व्यवस्था पोलीसांच्या सल्ल्याने करावी लागेल. आंदोलकांची वाहने ईस्टर्न फ्रीवेवरून वाडीबंदरपर्यंत येतील. त्यानंतर मुख्य नेत्यासोबत फक्त 5 गाड्यांना आझाद मैदानात प्रवेश मिळेल. बाकीच्या गाड्या पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी पार्क कराव्या लागतील.
- आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोकच सहभागी होऊ शकतात. आझाद मैदानासाठी सात हजार चौ. मीटर जागा राखीव असून ती इतक्या लोकांनाच सामावून घेऊ शकते. त्याच दिवशी इतर आंदोलकांनाही परवानगी दिली असल्याने त्यांचा हक्क अबाधित राहील.
- आंदोलनाच्या वेळी मोर्चा काढता येणार नाही.
- परवानगीशिवाय माईक, स्पीकर किंवा गोंगाट करणारी साधने वापरता येणार नाहीत.
- आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मर्यादित आहे. त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही.
- आंदोलनाच्या जागेत स्वयंपाक करणे, कचरा टाकणे पूर्णपणे बंदी आहे.
- आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास किंवा धार्मिक भावना दुखावणारे वर्तन करता येणार नाही.
- आंदोलनात लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि वृद्धांना सहभागी करू नये.
गणेशोत्सवाच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईतील रहदारीस कोणताही आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असं पोलिसांनी म्हटलं आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*