छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात रुग्णसेवेत मोठा बदल घडवून आणणारी नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. रुग्णांना रुग्णालयातील एका विभागातून दुसऱ्या विभागात जलदगतीने हलविण्यासाठी बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट अॅम्ब्युलन्स आणि सहा सीटर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मंगळवारपासून (२६ ऑगस्ट) ही सेवा सुरू झाली असून रुग्णांना याचा त्वरित लाभ मिळू लागला आहे.
घाटी रुग्णालयाला दोन बॅटरी ऑपरेटेड गोल्फ कार्ट अॅम्ब्युलन्स आणि दोन सहा सीटर वाहने मिळाली आहेत. यापैकी दोन वाहने प्रत्यक्षात सेवेत दाखल झाली आहेत, तर इतर वाहनेही लवकरच कार्यरत होतील. या सुविधा रात्री ८ वाजेपासून सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
या सुविधेमुळे अपघात विभागातून मेडिसिन विभागात तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जलदगतीने हलविणे शक्य होणार आहे. आतापर्यंत रुग्णांच्या हालचालीसाठी मोठ्या प्रमाणात वेळ लागत होता. मात्र गोल्फ कार्ट अॅम्ब्युलन्समुळे हा वेळ वाचून रुग्णांना वेळेत उपचार मिळतील, अशी अपेक्षा आहे.
वाहने दोन्हीही शिफ्टमध्ये सतत चालू राहतील आणि रुग्णवाहिकांसोबत अतिरिक्त सुविधा म्हणून ही सेवा उपयोगी पडेल. या प्रकल्पासाठी विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे, विशेष कार्य अधिकारी डॉ. सुरेश हरबडे, तसेच डॉ. गायत्री तडवळकर आणि डॉ. सुचेता जोशी यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
घाटी रुग्णालयात सुरू झालेल्या या आधुनिक सुविधेमुळे रुग्णसेवेत आमूलाग्र बदल होणार असून रुग्णालयातील व्यवस्थापन अधिक सुलभ आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*