मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या एल्गार यात्रेत आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. जुन्नरजवळ किल्ले शिवनेरी परिसरात रॅलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीची माती कपाळावर लावून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करून मराठा आरक्षणाची लढाई आरपार करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या यात्रेला हजारो वाहनांचा ताफा असून काल (दि. २७) अंतरवाली सराटी येथून या रॅलीला सुरुवात झाली. आज (दि. २८) सकाळी रॅली जुन्नर येथे दाखल झाली.

यावेळी हजारो मराठा बांधवांसह रॅली किल्ले शिवनेरी परिसरात पोहोचली असताना सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मराठा समाजात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांची एल्गार यात्रा मंचरमार्गे चाकणच्या दिशेने रवाना झाली आहे. पुणे-नाशिक आणि चाकण-तळेगाव महामार्ग भगवामय झाला असून मार्गावर ठिकठिकाणी चहा, नाश्ता, जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हजारो वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चाकण आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रातील बसेस आणि अवजड वाहनांना या मार्गावरून बंदी घालून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांचा मोर्चा आता मुंबईकडे रवाना झाला असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे. सतीश देशमुख यांच्या निधनामुळे या यात्रेत दु:खाचे सावट पसरले असले तरी आरक्षणाचा लढा मात्र अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,576 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क