छत्रपती संभाजीनगर : लाडक्या बाप्पाला शनिवार, ६ सप्टेंबर रोजी निरोप देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मोठी तयारी केली आहे. शहरात तब्बल ४१ ठिकाणी मूर्ती संकलन व दान केंद्रे उभारण्यात येणार असून, भाविकांना मूर्ती दान करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय एकूण १७ ठिकाणी विसर्जन विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. झोननिहाय कृत्रिम तलावांची सोय करण्यात येत असून, विसर्जन प्रक्रिया सुलभ आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

शहरात लहान-मोठ्या सुमारे २०० गणेश मंडळांसह हजारो घरगुती बाप्पांचे आगमन झाले आहे. विसर्जनाच्या दिवशी जंगी मिरवणुका काढल्या जातील, ढोल-ताशांचा गजर आणि राजकीय मंडळींचे शक्तिप्रदर्शनही पाहायला मिळेल. गर्दी टाळण्यासाठी आणि भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेच्या यांत्रिकी विभागाकडून विशेष योजना आखण्यात आली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी ४१ संकलन केंद्रे स्थापन करून त्याठिकाणी वाहने उभी केली जाणार आहेत. भाविकांनी मूर्ती मनपाला दान केल्यास ती परत मूर्तिकारांकडे दिली जाईल, तर विसर्जनासाठी आलेल्या मूर्ती वेगळ्या ठेवल्या जातील आणि त्यांचे विधिवत विसर्जन केले जाईल.

महापालिकेने ५१ पथके स्थापन केली असून, आणखी दोन राखीव पथके तयार ठेवली आहेत. याशिवाय शहरात १७ ठिकाणी विसर्जन विहिरी तयार केल्या गेल्या आहेत. कृत्रिम तलावांची विशेष सोय करण्यात आली असून, एन-७ येथील राजीव गांधी मैदानावर तीन मोठे तलाव तयार केले आहेत. हे तलाव ४ फूट खोल, ६ फूट रुंद आणि ४० फूट लांबीचे आहेत. अशा प्रकारचे तलाव इतर झोनमध्येही उभारले जात आहेत. विसर्जनानंतर मूर्ती त्वरित देवळाई येथील खदानीत नेऊन ठेवण्यात येणार आहेत.

या संकल्पनेमुळे नदी-नाल्यांमधील प्रदूषण कमी होईल आणि विसर्जन सुरळीत पार पडेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. विसर्जनाच्या प्रमुख ठिकाणी जि. प. मैदान, एन-१२, सातारा विहीर, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, पडेगाव, चिकलठाणा, देशमुखनगर आदी भागात ही सोय करण्यात आली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

606 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क