छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुजीब कॉलनी, कटकटगेट भागात पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने रविवारी (दि.७) दुपारी केलेल्या कारवाईत गावठी कट्टा, ड्रग्ससह अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. ही धडक कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शेख नियाज शेख नजीर (३५, रा. मुजीब कॉलनी) असे आरोपीचे नाव असून, तो यापूर्वी २०१७ मधील दंगलीच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी ठरला आहे.

एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना नियाज शेख हा अमली पदार्थांची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप धर्मे, सतीश जाधव, विजय त्रिभुवन, नितेश सुंदर्डे, महेश उगले, छाया लांडगे व इतर अंमलदारांनी त्याच्या घरावर छापा टाकला. तपासादरम्यान गादीखाली लपवून ठेवलेले दोन पाकिटांत सुमारे १२ ग्रॅम एमडी ड्रग्स सापडले. दुसऱ्या खोलीत कपाटात एक गावठी कट्टा मिळून आला. त्याशिवाय किचनमध्ये पांढऱ्या रंगाचा संशयास्पद १९ ग्रॅम पावडर जप्त करण्यात आली असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

छाप्यात अघोरी विद्येचे मोठ्या प्रमाणात साहित्यही पोलिसांना मिळून आले. गुप्तधन मिळविण्यासाठी काळ्या जादूचे प्रयोग करण्यासाठी नियाज शेखने दोन जनावरांची हाडे, कासवाचे कवच, रसायनाच्या बाटल्या, काळ्या रंगाचे भुताचे मास्क, चामडी हंटर, १०९, ५५ व ५३ कवट्यांच्या माळा, सिल्व्हर धातूचे रुमालात बांधलेले ८४ नाणे, सोनेरी रंगाचे ७९ नाणे, धातूचे कासव, अगरबत्ती व स्टॅन्ड, मेणबत्त्या, काळ्या दगडांचे तुकडे, हळद-कुंकू, ५०० रुपयांची बंद झालेली जुनी नोट, तसेच विविध औषधींच्या बाटल्या असे साहित्य घरात साठवून ठेवले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, नियाज शेख हा सध्या फळविक्रीचा व्यवसाय करत असला तरी त्याने मुंबईहून एमडी ड्रग्स आणून विक्रीचा धंदा सुरू केला होता. परिसरातील युवकांना तो अमली पदार्थ विकत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी गावठी कट्टाही विकत घेतला होता. कट्ट्याचा वापर करून कोणतीही गुन्हेगारी कारवाई झाली आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.

जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपीचा गुन्हेगारी इतिहास पाहता पोलिस त्याच्या साथीदारांचा कसून शोध घेत आहेत. शहरात गणेशोत्सव सुरू असताना अशा स्वरूपाचा भंडाफोड झाल्याने नागरिकांत मोठी चर्चा सुरू असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,201 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क