छत्रपती संभाजीनगर : शहरातील ११ दिवसांचा गणेशोत्सव भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने पार पडला असला तरी या काळात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले. बाप्पाच्या आगमनापासूनच सुरू झालेला हा सुळसुळाट विसर्जनापर्यंत कायम राहिला. पोलिसांना एकाही चोरट्याला पकडण्यात यश आले नाही. या काळात शहरातील विविध भागांतून तब्बल २२ मंगळसूत्रे आणि ४० हून अधिक मोबाइल चोरीला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
२७ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे आणि पुरुषांच्या खिशातील मोबाइलवर डल्ला मारायला सुरुवात केली. फक्त २८ ऑगस्ट रोजीच चोरीच्या घटनांचा आकडा ९ वर पोहोचला. सिडको, जवाहरनगर, टीव्ही सेंटर परिसरासह गजानन महाराज मंदिराजवळील बाजारपेठा चोरट्यांच्या निशाण्यावर होत्या. आनंदनगरीतून तर एकाचवेळी सहा महिलांची मंगळसूत्रे लंपास झाली. मुकुंदवाडीतही चोरीच्या घटना घडल्या.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान तर चोरांनी हद्दच ओलांडली. क्रांती चौक ठाण्यात चार महिलांच्या मंगळसूत्र चोरीच्या तक्रारी पहिल्याच दिवशी दाखल झाल्या. काही महिलांनी सिटी चौक व इतर ठाण्यांमध्ये धाव घेतली. अनेक नागरिकांनी मोबाइल चोरीच्या तक्रारी दिल्या आहेत.
याच मिरवणुकीत हरिदास लालचंद सोनी (७२, रा. समर्थनगर) यांच्या गळ्यातील तब्बल ७ तोळे सोने व हिऱ्यांची चेन लंपास करण्यात आली. तसेच सुरेखा दिनकर नागरे (रा. न्यू हनुमाननगर) यांची ७ ग्रॅमची पोत, ज्योती तिलक मित्रे (रा. भावसिंगपुरा) यांची ७ ग्रॅमची पोत आणि मीनाबाई सुरेखा बन्सवाल (रा. पदमपुरा) यांची ४ ग्रॅमची पोत गर्दीतून चोरांनी हिसकावून नेली. क्रांती चौक ठाण्यात एकूण १७ मोबाइल चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
टीव्ही सेंटर परिसरातून मनिषा राजू अन्वीकर (४ ग्रॅम), छाया संजय घोडके (५ ग्रॅम), सुजाता संजय साळुंके (५ ग्रॅम), वंदना प्रकाश ठाले (५ ग्रॅम) आणि आम्रपाली मनोज ढाले (३ ग्रॅम) यांची मंगळसूत्र चोरीला गेली. या भागातून यापूर्वीही चोऱ्या झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
गणेशोत्सव काळात पोलिस बंदोबस्त असतानाही चोरांनी यशस्वीपणे डाव साधल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या गुन्ह्यांचा तपास वेगाने करून आरोपींना गजाआड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*